Breaking News

इंद्रायणी रद्दमुळे रेल्वेस दीड कोटीचा फटका

सोलापूर,  - रेल्वे रुळांखालील खडी बदलण्याच्या कामास नोव्हेंबर 2017 पासून सुरुवात झाली. या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे पुणे - सोलापूर -पुणे इंटरसिटी (इंद्रायणी एक्स्प्रेस) रेल्वे प्रशासनाला रद्द करावी लागली. ही गाडी रद्द झाल्याने प्रवाशांना फटका बसला तसाच रेल्वे प्रशासनाला चांगलाच फटका बसला आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटी रुपयांचे उत्पन्न सोलापूर विभागाचे बुडाले आहे. तर दुसरीकडे हजारो प्रवासी एसटीच्या प्रवासाकडे वळले. त्यामुळे पुण्यासाठीच्या जादा वाहतुकीतून सोलापूर विभागाला जवळपास 87 लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले. शिवशाहीच्या फेर्‍याही वाढल्या.

इंद्रायणी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सिद्धेश्‍वर हुतात्मा एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडले. पण बहुतांश प्रवासी एसटी प्रवासाकडे वळले. सुरुवातीला सोलापूर -पुणे मार्गावर एक शिवशाही सुरू झाली होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस इंद्रायणी रद्द झाल्याने एसटी प्रशासनाने सोलापूर ते पुणे मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले. सोलापूर तसेच अक्कलकोट अन्य आगाराच्या गाड्या पुण्यासाठी सोडण्यात आल्या. दरम्यान एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने याचा विचार करून आणखी शिवशाही गाड्या सोलापूर -पुणे मार्गासाठी मंजूर करून सोलापूर विभागाच्या ताब्यात दिल्या. आता जवळपास शिवशाहीच्या दररोज सोलापूर ते पुणे 15 फेर्‍या होतात. तिकीट दर जास्त असूनही याला प्रवाशांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. जवळपास 70 टक्के भारमान शिवशाहीला लाभत आहे. अतिरिक्त टायमिंगच्या गाड्यांचा विचार केला तर रोज सोलापूर ते पुणे दरम्यान 70 ते 75 एसटी धावत आहे.