कोकणातील सर्व तालुक्यांमध्ये 7 जानेवारीला एकाच वेळी हिंदू चेतना संगम
रत्नागिरी, - आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 92 वर्षे झाल्याच्या निमित्ताने कोकण प्रांतातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी 7 जानेवारी रोजी हिंदू चेतना संगम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करून संघाची ध्येयधोरणे देशातील नागरिकांसमोर मांडली. यातून संघाचे लाखो कार्यकर्ते निर्माण झाले. ते देशभरात कार्यरत आहेत. संघाची स्थापना 1925 साली नागपूर येथे करण्यात आली होती. गेल्या 92 वर्षांत चांगल्या आणि शिस्तबद्ध कामामुळे संघाची वृद्धी झाली आहे. हजारो उच्च शिक्षित तरुण संघासाठी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. संघाची दैनंदिन शाखा, साप्ताहिक बैठका नियमित होत असतात. या एकत्रीकरणात समाजाच्या विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी कायकर्ते काम करत असतात. संघाची शिस्त व कार्यप्रणाली पाहून अनेक संस्था संघाच्या प्रेरणेने कार्यरत आहेत. संघात व्यक्ती पूजनीय नाही. परंपरेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्णाचा भगवा ध्वज गुरुस्थानी मानला जातो.
दोन वर्षांपूर्वी पुणे प्रांतामध्ये संघाचे कार्यकर्ते पूर्ण गणवेशात एकत्र येऊन संघाचा एक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून दीड लाख स्वयंसेवक एकत्रित आले होते. या कार्यक्रमाला हिंदू चेतना संगम असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येक प्रांतामध्ये हिंदू चेतना संगम हा कार्यक्रम संघाने जाहीर केला. त्यानुसार मुंबई ते गोवा या प्रांताचे हिंदू चेतना संगम हा कार्यक्रम 7 जानेवारीला जाहीर करण्यात आला आहे. प्रांतातील प्रत्येक तालुकास्तरावर या दिवशी प्रत्येक स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होणार रत्नागिरी जिल्ह्याचा चेतना संगम रत्नागिरीत पार पडणार आहे. याचवेळेला जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये तसेच पूर्ण प्रांतातील तालुक्यांमध्ये 7 रोजी सायंकाळी 4 ते 6 या कालावधीत एकत्रीकरण केले जाणार आहे. या वेळी जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात सहभागी होण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.