Breaking News

आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार करणार्‍याला पोलीस कोठडी

रत्नागिरी,- शिकवणीला गेलेल्या आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून पलायन करणारा संशयित स्वप्नील माने याला जेरबंद करण्यास दापोली पोलिसांना यश आले असून त्याला अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले असता 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दापोली-खेड मार्गावरील एका गावात गेल्या 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिकवणीला गेलेल्या व तेथील प्रसाधनगृहात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका आठ वर्षीय बालिकेवर शिकवणी वर्ग घेणार्या शिक्षिकेचा स्वप्नील माने याने अत्याचार केला. या मुलीने आपल्या नातेवाईकांना ही हकीगत सांगितल्यावर तिला उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मुलीला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेईपर्यंत स्वप्नील स्वतःच्या घरात काहीच घडले नसल्यासारखा वागत होता. मात्र त्या मुलीने उपजिल्हा रुग्णालयात आपल्या वडिलांना काय झाले आहे हे सांगितले तेव्हा, तिचे वडील संतापले व आपल्या गावाकडे निघाल्याचे संशयित स्वप्नीलला कळल्यावर त्याने घरातून पोबारा केला. 

गावातील तरुणांनी तसेच पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. अखेर दापोली पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या मोबाइलच्या सीडीआरद्वारे त्याचे ठिकाण शोधून काढले. तो संश यित गावातील एका बंद असलेल्या देशी दारूच्या दुकानाच्या छतावर लपून बसला होता. काल (दि. 29 डिसेंबर) रात्री दापोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आज त्याला खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, त्या बालिकेची प्रकृती आता सुधारत असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.