Breaking News

ग्रामसेवकांचे 24 जानेवारीला मूक मोर्चाचे आयोजन

पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत ही ग्रामीण जनतेशी व विकासाशी निगडीत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेत काम करणार्‍या ग्रामसेवक संवर्गाची सध्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. ग्रामसेवकाचे काम ग्रामविकास विभागाशी संबंधित न राहता सर्वच विभागांशी संबंधित झाली आहेत. इतर विभागाच्या कामाच्या अतिरिक्त बोेजामुळे ग्रामसेवकांवरील ताण वाढत आहे. धुळे जिल्ह्यातील गोंटूर ग्रामपंचायत येथील ग्रामविकास अधिकारी एस. बी. वाघ यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने संपूर्ण ग्रामसेवक संवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाघ यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी तसेच दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे दि. 24 जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदांवर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.


याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात ढाकणे यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाव्यतिरिक्त इतर विभागाच्या कामाचा बोजा, आर्थिक पिळवणूक, मानसिक छळ, नियमबाह्य कामांसाठीचा दबाव यामुळे मागील दोन वर्षात राज्यातील 40 ते 50 ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय शेकडो ग्रामसेवक अपघातात जायबंदी झाले आहेत. सुमारे 1500 ग्रामसेवकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले. सातत्याने होणार्‍या अशा घटनांमुळे ग्रामसेवक संवर्गाचे जीवन बरबाद होत आहेत. ग्रामसेवक संवर्ग केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या योजना, नागरिकांच्या मुलभूत गरजा अशी दैनंदिन कामे करीत असताना वरिष्ठ अधिकारी विना नोटिस निलंबित करणे, अतिरिक्त दबाव, वेतनवाढ बंद करणे, प्रसंगी आर्थिक पिळवणूक करणे असे त्रासदायक प्रकार करतात. वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत स्थानिक राजकारणातून नियमबाह्य लाभार्थी निवडीस भाग पाडले जाते, मनरेगा सारख्या मागणी आधारित योजनांसाठी उद्दीष्ट दिले जाते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामसेवक संवर्ग रात्रंदिवस काम करीत आहे. अशा परिस्थितीत ग्रामसेवकांवर सातत्याने होणारे हल्ले, प्रशासकीय कारवाया यातून ग्रामसेवकांना नोकरी असुरक्षित वाटायला लागली आहे.