एसटी-आयशर ट्रकची धडक, 16 जण जखमी
सांगली, - सांगली- इस्लामपूर रस्त्यावरील कदमवाडी फाट्यानजीक रविवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास एसटी व आयशर ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी व आयशर ट्रक चालकासह 16 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर येथील वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सांगली- इस्लामपूर (क्रमांक एमएच 20- बीएल 1365) ही एसटी प्रवासी घेऊन सांगली बसस्थानकातून निघाली होती, तर आयशर ट्रक (क्रमांक एमएच 10- झेड 4696) हा सांगली शहराकडे येत होता. ही दोन्हीही वाहने कदमवाडी फाट्यानजीक आली असता त्यांची समोरासमोर धडक झाली. त्यात एसटी चालक संपतराव वसंतराव रेळेकर (रा. येलूर, ता. शिराळा) व आयशर ट्रकचालक मच्छिंद्र आकाराम कांबळे (रा. बुधगाव, ता. मिरज) यांच्यासह 16 प्रवासी जखमी झाले.
ओव्हरटेक करीत असताना एसटीचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. या अपघाताचे वृत्त कळताच नागरिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना शासकीय रू ग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात आयशर ट्रकचे सुमारे अडीच लाख, तर एसटीचे 30 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार निवास कांबळे करीत आहेत.