Breaking News

एसटीमधून 15 लाख पळवले, बँकेत नेत होते तिकिटाचे पैसे

सोलापूर, - सोलापूर एसटी स्थानकात बस तिकीट विक्रीतून आलेले पंधरा लाख बँकेत भरण्यासाठी नेताना चोराने डल्ला मारला. रोखपालाने एका पेटीत पैसे आणून चालकाच्या पाठीमागील सीटवर ठेवले. सिक्युरिटी गार्ड येईना म्हणून पेटी ठेवून ते खाली उतरले. काही मिनिटांत पेटी गायब झाली. त्याअगोदर एका तरुणाने ही बस कु ठे चालली आहे म्हणून विचारणा केली होती. पेटी ठेवलेल्या सीटशेजारी आपात्कालीन खिडकी होती. तेथून सहज हात घालून पेटी काढली असावी, असा संशय पोलिसांचा आहे. 


रोखपाल विवेक भास्करराव देशपांडे (वय 55, रा. द्वारकानगरी, विजापूर रोड) यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली आहे. 14 लाख 76 हजार 216 रुपये जमा झाले होते. रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियात (बाळीवेस) भरण्यासाठी एसटीबसने नेत होते. एरव्ही रोखपाल, बसचालक सिक्युरिटी असा लवाजमा सोबत असतो. नेहमीप्रमाणे बसगाडी (एमएच 40 एन 9500) बाहेर जाण्याच्या गेटजवळ थांबली होती. देशपांडे पैसे ठेवून खाली थांबले. चालक आजमोद्दीन तालीकोटी होते. वॉचमन येईना म्हणून देशपांडे खाली उतरले होते. काही वेळाने पाहिल्यानंतर बॅगच नव्हती. घाबरलेल्या स्थितीत आगारप्रमुख एस. एस. कदम यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अधिकारी घटनास्थळी आले. पाहणी करून निघून गेले. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना विचारले असता, सर्व शक्यता गृहीत धरून चौकशी सुरू आहे. अशा पद्धतीने चोरी करणारी टोळीची माहिती काढत आहोत.

पत्ता विचारण्याचा बहाणा, काही मिनिटांत झालेली चोरी बँकेत पैसे भरण्यासाठी जी बस वापरली जाती ती बस सोलापूर-वडापूर, वडापूर- सोलापूर या मार्गावर जाणारी असते. ती सकाळी सातला सोलापुरात निघून परत सकाळी पावणे अकराला येते. बस आल्याची माहिती चालकाने कॅशियरला दिली. कॅशियरने पैसे आणले. पहिल्या चालकाची ड्यूटी बदलली. दुसरा चालक येणार होता. दरम्यान, पैसे घेऊन बसमध्ये बसल्यानंतर एकाने बसची चौकशी केली. हा बहाणा करून टेहळणी केली. कुणी वॉच ठेवून हे काम केले आहे का? या दृष्टीने तपास व्हावा. पंधरा लाखांची बॅग ठेवून खाली उतरणे हेही दुर्लक्षच असल्याची चर्चा बस स्थानकावर होती.