Breaking News

श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिर परिसरातील कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

सिंधुदुर्गनगरी, दि. 21, डिसेंबर - गावोगावच्या देवी देवतांच्या साक्षीने व लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत 13 फेब्रुवारी 2018 रोजी कोकणकाशी म्हणून संबोधल्या जाणार्‍या श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा संपन्न होत आहे. परंतु मंदिर परिसरातील विकासकामांकडे प्रशासनाकडून होत असलेला दुर्लक्ष पाहता यात्रेच्या निमित्ताने मात्र दरवर्षी होत असलेल्या यात्रा नियोजन बैठकांचे नेमके फलित काय?असा सवाल उपस्थित केला जात आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या कुणकेश्‍वर मंदिर ते पर्यटन संकुलला जोडलेल्या रस्त्याशेजारी वाहनतळाचे काम आजही अर्धवट स्थितीत आहे. मं दिराच्या समुद्र तटालगत संरक्षक भिंतीला लागून समुद्रकिनारी उतरण्यासाठी पायर्यांचे आर. सी. सी. बांधकाम करणे गरजेचे असून मागील 3 वर्ष याबाबत वारंवार पाठपुरवा करू नही प्रत्यक्षात मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचेच दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसराचे उर्वरित फ्लोरिंग व सुशोभीकरणाचे कामही शिल्लक आहे. 

भाविक यात्रेकरूना कुणकेश्‍वर तीर्थक्षेत्री धार्मिक विधी करण्याकरता शेड बांधण्यात यावी, समुद्रकिनारी भाविकांच्या सुखसोई करता महिला व पुरुषांसाठी एक मजली स्वच्छतागृह उभारण्यात यावे, कुणकेश्‍वर गावातील संपूर्ण यात्रा परिसर ते मंदिर पर्यंतच्या वीजवाहिन्या शासन निधीतून ‘अंडर ग्राऊंड’ करणे ह्या मागण्यांची अद्यापही पूर्तता झालेली नाही.