Breaking News

नाशिकच्या पळविलेल्या बोटी परत आणून बोट क्लब सुरु करण्यासाठी आंदोलन

नाशिक, दि. 21, डिसेंबर - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पर्यटनाच्या वाढीसाठी जागतिक दर्जाच्या बोट क्लब सारखा महत्वपूर्ण प्रकल्प साकारला. मात्र गेल्या तीन वर्षापासून सत्तेत आलेल्या युती सरकारकडून हा बोट क्लब सुरु करण्यात आलेला नाही. तसेच येथील बोटी सारंगखेडा जि.नंदुरबार येथील पर्यटनस्थळी हलविण्याचे काम पर्यटन मंत्र्याकडून केले आहे. 


त्यामुळे याच्या निषेधार्थ नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आ.जयवंतराव जाधव व दिंडोरीचे आ.नरहरी झिरवाळ यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आज निषेधाचे फलक झळकावून निदर्शने केली.


नाशिक येथे प्रादेशिक पर्यटनमधील निधीतून नाशिक येथे जागतिक दर्जाच्या बोट क्लबचे काम मार्च 2014 मध्ये पूर्ण होवूनही अद्यापपर्यंत हा बोटक्लब सुरु करण्यात आलेला नाही. सदर बोट क्लब गंगापूर धरणाच्या बॅक वॉटर भागात असून या ठिकाणी जेट्टी,प्रशासकीय इमारत,इक्विपमेंट करिता देखभाल दुरुस्ती शेड,प्रेक्षकगृह, खुले सभागृह,वाहनतळ इ. तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना बोटिंगसाठी यु.एस.ए मेड युरो 4 नॉर्मच्या 47 अत्याधुनिक बोटी धरणस्थळी दाखल झालेल्या आहे.