Breaking News

ग्रामसेवकाचा अपहार साडेपाच कोटींचा ?

सिंधुदुर्गनगरी, दि. 10, डिसेंबर - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधून होणारा आर्थिक अपहार वाढतच चालला असून एकूण 284 प्रकरणांमध्ये तब्बल साडेपाच कोटी रुपयाचा संशयित आर्थिक अपहार झाला आहे, अशी माहिती जि. प. च्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. या अपहारप्रकरणी संबंधित ग्रामसेवकांवर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.


जिल्ह्यात कमी पटसंख्या असलेल्या 153 शाळा बंद करण्यात येणार आहेत, अशीही माहिती सभेत देण्यात आली. मात्र, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करून स्थलांतरित करत असाल तर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सुविधा निर्माण करा आणि वर्ग तेवढे शिक्षक द्या. अन्यथा शाळाबंद करून स्थलांतरास विरोध राहील. याबाबत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गटनेते सतीश सावंत यांनी दिला. जि. प. च्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली.
जिल्ह्यातील काही ठराविक ग्रामसेवक पुन:पुन्हा आर्थिक अपहार करत आहेत. अशा ग्रामसेवकांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना पदोन्नती देऊ नयेत. मोठ्या ग्रामपंचायती त्यांच्याकडे देऊ नये, अशी सूचना गटनेते सतीश सावंत यांनी केली. याचवेळी अपहार केलेल्या ग्रामसेवकांची यादी तयार करण्यात येत असून सद्यस्थितीत ग्रामपंचायतींमधून 284 प्रकरणात 5 कोटी 50 लाख रुपयांचा संशयित अपहार झाल्याची माहिती कमलाकर रणदिवे यांनी दिली. संबंधित ग्रामसेवकांवर वसुलीच्या कारवाईच्या नोटिसा बजावण्यात
आल्याचेही त्यांनी सांगितले.