गोहत्या, गोतस्करी करणारे मरणारच!
गोसुरक्षेच्या नावाखाली देशभर काहूर माजले असतानाच भाजपाच्या राजस्थानातील एका आमदाराने गोहत्या किंवा गोतस्करी करणारे असेच मरत राहणार, असे वादग्रस्त विधान करून सत्ताधारी पक्षाच्या अडचणींत भर टाकली आहे. या विधानामुळे भाजपाची मोठी गोची होण्याची शक्यता आहे. आहुजा यांनी यापूर्वी दिल्ली स्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयु) बलात्काऱ्यांचा अड्डा असल्याचे विधान करून एकच खळबळ माजवून दिली होती.
अलवर पोलिसांनी शनिवारी गायींची वाहतूक करणारा एक ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हे वाहन पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून पुढे निघून गेले. तद्नंतर स्थानिक लोकांनी या ट्रकवर हल्ला केला. ट्रकमधील २ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, जमावाने झाकीर नामक एका व्यक्तीला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. भाजप आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी माध्यमांशी बोलताना झाकीरला मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.