Breaking News

डिजिटल युगात मुलांच्या सुरक्षेसाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करण्याची राज्यपालांची सूचना


मुंबई, दि. १३ : डिजिटल तंत्रज्ञानामुळे मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहेत तसेच शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व गुणवत्ता सुधार, आरोग्य सेवा विस्तार या क्षेत्रातदेखील क्रांतिकारी बदलाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान सर्व मुलांना सहजतेने उपलब्ध झाले पाहिजे. मात्र दुसऱ्या बाजूला, डिजिटल माध्यमातून लहान मुलांचे शोषण, त्यांच्याविरुद्ध हिंसा व मुलांचा व्यापार होत आहे. त्यामुळे लहान मुलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी शाळा,आश्रमशाळा, अनाथालये, सुधारगृह, इत्यादी याठिकाणी मुलांच्या सुरक्षेसाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करण्याची सूचना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केली.
युनिसेफच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘जगातील लहान मुलांची सद्यस्थिती २०१७’ या अहवालाचे डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.आज समाज माध्यमांमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य तसेच हानिकारक दृकश्राव्य गोष्टी मुक्तपणे उपलब्ध आहे. हे चित्र बदलून लहान मुलांना सकारात्मक, योग्य व सुरक्षित अशा प्रकारचे डिजिटल कंटेंट उपलब्ध झाले पाहिजे याकरिता सर्वच क्षेत्रातील तज्ञांनी विचारमंथन करून उपाययोजना केली पाहिजे. शाळांमध्ये देखील डिजिटल साक्षरता निर्माण केली पाहिजे असे,त्यांनी सांगितले.