Breaking News

गुजरातमध्ये काँग्रेस एकतर्फी विजयी होणार - राहुल गांधी.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांनी मोदींच्या द्वेषाच्या राजकारणामुळे आपण अधिक मजबूत झाल्याचा टोला लगावला. मात्र ऐन मतदानापूर्वी राहुल गांधींची मुलाखत प्रसारित झाल्याबद्दल भाजपने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 


गुजरात निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका गुजराती वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल गांधींनी भाजप आणि मोदींवर सडकून टीका केली. गुजरातमध्ये मी जनतेचा आवाज होऊन मोदींना प्रश्न विचारत होतो. 

मात्र मोदींनी माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. गुजरातमधील कथित विकासावर बोलण्यास ते तयारच नव्हते. कारण ते सर्वसामान्य जनतेला घाबरले आहेत. त्याउलट काँग्रेसला जनतेचे प्रेम मिळत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून मी गुजरातचा मूड पाहतोय. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल एकतर्फी असेल. 

काँग्रेस बहुमताने विजय होईल, असा दावा राहुल यांनी केला. आपल्या नेतृत्वात एवढा बदल कसा काय झाला, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी यासाठी मोदींचे आभार मानले. भाजपने माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. वारेमाप पैसा उधळला. असे राहुल म्हणाले.