Breaking News

मालवणमध्येही होणार कुत्र्यांच निर्बीजीकरण

सिंधुदुर्गनगरी, दि. 16, डिसेंबर - मालवण मध्ये आता भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणार्‍या मोहिमेसाठी निवारा केंद्राच्या विशेष कक्षाच उद्घाटन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि डॉ. शरद दिघे यांच्या हस्ते आणि मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या उपस्थितीत झाल. ’माय वेट्स’ या संस्थेच्या सहक ार्याने ही मोहीम राबवण्यात येत आहे.


मालवण पालिका आरोग्य विभाग आणि ’माय वेट्स चॅरिटेबल ट्रस्ट आणि रिसर्च सेंटर, मुंबई’ यांच्या संयुक्त सहकार्याने मालवण शहरात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत पालिकेच्या वतीने नगरपालिका आवारात उभारण्यात आलेल्या निवारा केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माय वेट्सच्या अध्यक्षा डॉ मधुरीता गुप्ता, सचिव डॉ युवराज कागीनकर, संचालक डॉ रूपम गुप्ता, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, मुख्याधिकारी रंजना गगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बांधकाम सभापती सेजल परब, महिला बालविकास सभापती तृप्ती मयेकर, गटनेते गणेश कुशे, नगरसेवक दीपक पाटकर, यतीन खोत, पंकज सादये, जगदीश गावकर, पुजा करलकर, दर्शना कासवकर, शीला गिरकर, पुजा सरकारे, सुनीता जाधव, स्वच्छता दूत महेंद्र पराडकर व नागरिक उपस्थित होते.

या निवारा केंद्रात शास्त्रकिया विभागासह आठ पिंजरे उपलब्ध करून देण्यात आले असून भटक्या कुत्र्यांना प्रत्येक रविवारी पकडून सोमवारी त्यांचे निबिर्जीकरण केले जाणार आहे. रेबीज होऊ नये म्हणून शहरातील सर्व कुत्र्यांवर लसीकरण केले जाणार आहे. यासाठी माय वेट्स संस्थेने यासाठी औषधें, रुग्णवाहिका, डॉक्टर, ड्रायव्हर व वार्डबॉय उपलब्ध करून दिले असून मोकाट कुत्र्यांवर विनामुल्य उपचार केले जाणार आहेत. खाजगी कुत्र्यांवरील उपचारास नाममात्र फी आकारणी करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम देवगड व वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या आग्रहावरून ’माय वेट्स’ संस्थेने मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबविली. त्यानंतर आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी देवगड येथे या संस्थेच्या संचालकांची भेट घेऊन मालवण येथे या प्रकारची मोहीम राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. 

18 डिसेंबर पासून मालवण शहरात या मोहिमेस प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. तसेच शहरात रॅबीज झालेले कुत्रे आढळल्यास तत्काळ य संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन ’माय वेट्स’ या संस्थेकडून करण्यात आले असून यासाठी भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.