Breaking News

महावितरण देणार ’मागेल त्याला वीज जोडणी’

सिंधुदुर्गनगरी, दि. 16, डिसेंबर - महावितरणतर्फे ’पंतप्रधान हर घर बिजली योजना’ म्हणजेच ’सौभाग्य’ योजनेंतर्गत घराघरात वीज जोडणी देण्यात येणार आहे. मागेल त्याला वीज जोडणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 20 कोटींचा प्रकल्प महावितरणतर्फे राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आठवडाभरात 150 वीज जोडण्या देण्यात येणार आहेत.


महावितरणने स्वपातळीवर सौभाग्य योजना राबविण्याच्या घेतलेल्या निर्णयात बीपीएल कार्डधारकांना मोफत, ते एपीएल कार्डधारकांकडून 500 रुपये वीज जोडणीसाठी घेण्यात येणार आहे. मात्र हे पैसे रोखीने न घेता ग्राहकांच्या बिलातून दरमहा वसूल केले जाणार आहेत. महावितरणने या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3545 वीज जोडण्या देण्याचे निश्‍चित केले आहे. ग्राहकांकडून अर्ज येतील, त्यांना महावितरणतर्फे जोडणी देण्याबरोबरच प्रत्येक घरात वीज पोहचविण्याचा मानस आहे. 

संबंधित ग्राहकांकडून साधा अर्ज स्वीकारण्यात येणार असुन, त्यांना तातडीने जोडणी दिली जाणार आहे. शहरातील ज्या बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांकडे वीज नाही, त्यांनी अर्ज करून जोडणी घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग मंडळाचे अधीक्षक चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.