Breaking News

ओखी वादळग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील


नागपूर, दि. १८ : राज्यातील ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून नियमानुसार त्यांना मदत देण्यात येईल, असे महसूल, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषदेत सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील विशेषतः रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यात ओखी वादळामुळे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झालेल्या कडधान्य व भाजीपाला पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओखी चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जाकीमिऱ्या येथील 52 मच्छिमारांची जाळी वाहून गेल्याने अंदाजे 43.26 लाख रुपयांचे नुकसान झालेले असून यासंबंधी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांचेमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत.