Breaking News

भंडारा मनरेगा मॉडेल इतर जिल्ह्यांनी राबवावे – मुख्यमंत्री


नागपूर : जिल्ह्यात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच विविध विकास कामे करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्ह्याने चांगले काम केले आहे. त्यामुळे मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी या योजनेचा उपयोग झाला आहे. मनरेगाची मजुरी देण्यासाठी भंडारा जिल्ह्याने विशिष्ट कार्यपद्धती अवलंबली त्यामुळे मजुरांना वेळीच कामाचा मोबदला मिळण्यास मदत झाली आहे. भंडारा जिल्ह्याचे हे मॉडेल राज्यात राबविण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधान भवनातील सभागृहात 18 डिसेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या विकास कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे, ॲड रामचंद्र अवसरे, राजेश काशीवार, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, भंडाराचे पालक सचिव रजनीश सेठ, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी व विविध विभागाचे वरिष्ठ व प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.