Breaking News

दुसरी खेप...! बहुजननामा

बहुजनांनो...! समाजाचे ध्रृवीकरण व वर्गिकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विषम समाजव्यवस्थेत ही प्रक्रिया सातत्य राखून असते. कोणतीही समाजव्यवस्था ‘उगम-विकास-अंत’ च्या प्रक्रियेतून जात असते. नवी समाजव्यवस्था जुनी झाल्यावर कर्मठ होत जाते. तिचे अर्थव्यवस्थेसारखे आधारस्तंभ जुनाट व खिळखिळे होत जातात. जेव्हा एखाद्या समाजव्यवस्थेची अर्थव्यवस्था कमजोर होते, तेव्हा सर्वात जास्त फटका उत्पादक शक्तींना बसतो. सर्वसामान्य जनतेची (मध्यमवर्ग वा मध्यम जातीयांची) क्रयशक्तीही कमी होत जाते. त्यामुळे या जुन्या व्यवस्थेविरोधात असंतोष निर्माण होऊन विद्रोहाची स्थिती निर्माण होते. हा विद्रोह दाबून टाकण्यासाठी जुन्याव्यवस्थेचे लाभार्थी सातत्याने प्रयत्न करीत असतात. जुन्या व्यवस्थेला डागडुजी करून तिला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. 


दुसरीकडे ते विद्रोही शक्तीला साम-दाम-दंड-भेद या नीतीने दडपण्याचा प्रयत्न करीत असतात. या संघर्षातून नकळतपणे धृव्रीकरणाची प्रक्रिया सुरू होते. दोन शत्रूपक्ष दृष्य होत जातात. त्यांच्या संघर्षातून दोन्ही बाजूला कार्यकर्ते व नेते निर्माण होतात. या दोन्ही शत्रूपक्षाची बाजू मांडण्यासाठी दोन्ही बाजूला विचारवंत-तत्वज्ञानी निर्माण होतात. या संघर्षात शेवटी पुरोगामी पक्षाचा विजय होतो. कारण या पक्षाकडे नवी विकसित उत्पादन साधने असतात, नव्या विकसित उत्पादन शक्ती आकार घेत असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या पुरोगामी पक्षाची बाजू मांडणारे विचारवंत-तत्वज्ञानी प्रस्थापित समाजाच्या ध्रृवीकरणाला वेग देणारे विचार-तत्वज्ञान मांडतात, ते प्रबोधनाच्या माध्यमातून जनमाणसात बिंबवतात. समाजव्यवस्थेचे नवे पुरोगामी मॉडेल तयार करतात. ध्रृवीकरण जसजसे गतिमान होत जाते तसतसे नवे वर्गीकरण भक्कम होत जाते. दोन्ही वर्गांमधील हितसंबंधी तणाव वाढत जातो व शेवटी दोन्ही वर्ग वैचारिक, व्यवहारिक व भौतिकदृष्ट्या स्पष्टपणे एकमेकांसमोर उभे ठाकतात. या सर्व प्रक्रियेतून एक नवा व सापेक्ष समतावादी समाज निर्माण होतो

जगभरच्या समाजात ही प्रक्रिया सुरू आहे. आदिम साम्यवादी(?) समाजाच्या पतनानंतर वर्गीय समाज निर्माण झाला. त्यातील वर्गीय संघर्षांमुळे काही जुन्या समाजव्यवस्था ढासळल्यात, नष्ट झाल्यात व नव्या सापेक्षतेने पुरोगामी व्यवस्था निर्माण झाल्यात. दासप्रथाक समाजात स्वामीवर्ग व गुलामवर्ग असे दोन वर्ग होते. त्यांच्या संघर्षातून सापेक्ष पुरोगामी असलेला नवा सामंतप्रथाक समाज निर्माण झाला. त्यात सामंत-जमिनदारवर्ग व कूळ-शेतकरी वर्ग असे दोन वर्ग होते. सुरूवातीला ते अ-शत्रूभावी वर्ग असतात. परंतू जसजसा अन्याय-अत्याचार वाढत जातो तसतसा हितसंबंधात तणाव वाढतो व हे दोन्ही वर्ग शत्रूभावी होत जातात. त्यांच्या संघर्षातून अधिक पुरोगामी असलेला नवा भांडवली समाज निर्माण होतो. समाजविकासाबरोबर तंत्रज्ञानाचा विकास होतो, त्यातून उत्पादन साधने विकसित होतात. ही साधने ज्यांच्या मालकीच्या असतात ते नवा पुरोगामी वर्ग म्हणुन कारखानदार भांडवलदार बनतात व त्या कारखान्यात प्रत्यक्ष काम करणारा नवा पुरोगामी ‘कामगारवर्ग’ तयार होतो. सुरूवातीला ते अ-शत्रूभावी पुरोगामी वर्ग म्हणून एकत्रितपणे काम करतात व भांडवली समाजाचा विकास करतात. मात्र ही भांडवली व्यवस्था चरम विकासानंतर कुंठित होत जाते. त्यातून मंदी, बेरोजगारी सारखे अरिष्ट्ये निर्माण होतात. अर्थव्यवस्था ढासळायला सुरूवात होते. 

या भांडवलीव्यवस्थेचे लाभार्थी तिला डागडूजी करून वाचविण्याचा प्रयत्न करतात. रोजगार हमी योजना, बँकांचं राष्ट्रीयकरण, गरीबी हटाव यासारख्या तकलादू व फसव्या उपाययोजना करून प्रस्थापित व्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हितसंबंधांतील तणाव वाढत जातो, संघर्षही वाढत जातो व परिणामी अधिक पुरोगामी असलेला कामगारवर्ग जागृत, संघटित होतो. त्याला नवा क्रांतीकारक विचार-तत्वज्ञान देण्याचे काम मार्क्स-एंजल्ससारखे महापुरुष करतात. नव्या साम्यवादी समाजाचे स्वप्न उराशी घेत लढणारा कमगारवर्ग यशस्वी होतो. कामगारवर्गाची लोकशाही समाजव्यवस्था स्थापन होते. अशा प्रकारच्या क्रांत्या जगभर झालेल्या आपण पाहतो. त्यात प्रतिक्रांती होऊन पुन्हा जुन्या समाजव्यवस्था पुनर्रज्जीवीत झालेल्याही आपण पाहतो. परंतू भारतात असे झाले काय??? किंवा आजतरी असे घडतांना दिसत आहे काय?? भारतात आदिम साम्यवादी समाज होता काय? त्याच्या अंतानंतर वर्गव्यवस्था आली की आणखी दुसरीच व्यवस्था आली? भारतात झालेल्या व होऊ घातलेल्या क्रांत्या -प्रतिक्रांत्यांचे स्वरूप काय? या सर्व प्रश्‍नांच्या उत्तरांसाठी आपण थांबू या पुढच्या रविवारपर्यंत... तो पर्यंत जयजोती! जयभीम!! 


- प्रा. श्रावण देवरे