Breaking News

शंभर कोटींचा विकासानिधी हरवला? आशुतोष काळेंची शंका


कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी शंभर दिवसांत शंभर कोटींचा निधी आणल्याच्या वलग्ना केल्या होत्या. लोकप्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे घोषणा करून पेपरबाजी केली. पण आज झगडे फाटा-वडगाव पान रस्त्यासह तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शंभर कोटी तर सोडा. पण एक कोटीचासुद्धा निधी तालुक्यात कुठे आल्याचे दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने दिलेला शंभर कोटींचा विकासनींची आपल्या कर्तबगार {?} लोकप्रतिनिधींकडून हरवला तर नाही ना, अशी शंका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता काळेंनी ही शंका उपस्थित केली.
ते म्हणाले, की तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिका-यांनी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व पणन महामंडळाकडे चांदेकसारे बाजारतळाच्या सुशोभिकरणासाठी निधी मागणी केली होती. कृषी व पणन महामंडळाने या मागणीचा सकारात्मक विचार करून चांदेकसारे ग्रामपंचायतीला रुपये २५ लाख रुपये निधी मंजूर केला. दरम्यान, हा निधी ग्रामपंचायतीला नुकताच प्राप्त झाला आहे. या निधीतून बाजारतळ सुशोभिकरणाच्या कामाच्या काळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विष्णू होन होते.

काळे म्हणाले, तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते, हे समजेनासे झाले आहे. झगडे फाटा-वडगावपान रस्त्यासह सर्वच रस्त्यांची अवस्था तर खूप दयनीय झाली आहे. या रस्त्यावर जो टोलनाका सुरु होता, तो आजही सुरु असायला हवा होता का, असा मिश्किल सवालही त्यांनी उपस्थित केला. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा कारभार कसा सुरु आहे, हे तालुक्याच्या जनतेला कळेनासे झाले आहे. जनतेने दिलेल्या संधीचे सोने त्यांना करता येत नसून सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी असतांना विकास कामांसाठी निधी मिळविण्यातही त्यांना अपयश येत आहे, असा आरोप काळे यांनी केला.

दरम्यान, चांदेकसारे बाजारतळाचे संपूर्णपणे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यामध्ये ५० बाय १२ फुटाचे नवीन चार ओटे, संपूर्ण जुन्या व नवीन ओट्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व संपूर्ण बाजारतळ परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. हे काम तीन महिन्याच्या आत पूर्ण होणार आहे. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, काकासाहेब जावळे, माजी संचालक डॉ. गोरक्षनाथ रोकडे, राहुल रोहमारे, माजी सरपंच मतीन शेख, लाला होन, भीमा होन, नूरमहंमद शेख, भैया सय्यद, गोकुळ गुरसळ, पंकज पुंगळ, शंकर चव्हाण, युनुस शेख, दगू होन, भास्कर होन, चंद्रकांत होन, दादासाहेब होन, द्वारकानाथ होन आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण होन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार मानले.