Breaking News

कर्नाटकचा मुंबईवर १ डाव २० धावांनी विजय

नागपूर : तब्बल ४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरलेल्या मुंबई संघाला पराभूत करण्यास माजी विजेत्या कर्नाटकला केवळ चार दिवस पुरेसे झाले. मुंबईचा दुसरा डाव ३७७ धावांत आटोपल्यामुळे कर्नाटकने मुंबईवर १ डाव आणि २० धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत मजल मारली.

मुंबईला पहिल्या डावात १७३ धावांत गुंडाळल्यावर कर्नाटक ने पहिल्या डावात ५७० धावा करून ३९७ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवस अखेर मुंबईने ३ खेळाडू गमावून ११२ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी सूर्यकुमार यादव, आकाश पारकर (६५) आणि सिद्धेश लाडने (३१) जोरदार प्रतिकार करत डावाचा पराभव टाळण्याचे प्रयत्न केले. कर्नाटकचे ५ बळी घेणाऱ्या शिवम दुबेने ९१ चेंडूंत ७१ धावा करून अष्टपैलू खेळाडू म्हणून ठसा उमटवला; पण कृष्णप्पा गौतमच्या प्रभावी फिरकीपुढे मुंबईचा दुसरा डाव ३७७ धावांवर आटोपला. मुंबईतर्फे माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने एकाकी लढा देत १६ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने १०८ धावा केल्या. गौतमने १०४ धावांत ६ बळी घेतले..