Breaking News

कर्जमाफीमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण

नाशिक, दि. 14, डिसेंबर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील पात्र 84 हजार 374 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. निफाड तालुक्यातील कैलास शिंदे यांचेवर 31 हजार 500 रुपयांचे के. कर्ज भरण्याची त्यांची ऐपत नव्हती. पावसामुळे घराचा काही भाग पडल्याने भाड्याच्या घरात रहायला जावे लागले. 


विहिर धसल्याने सिंचनाची सुविधा नव्हती. कर्जावरील व्याज एका बाजूला वाढत असताना कर्ज फेडण्यासाठी इतरांकडून उसने घेण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. कर्जमाफीमुळे त्यांची चिंता दूर झाली आहे. आता 72 आर क्षेत्रात भावासोबत शेतीकडे चांगले लक्ष देता येईल, अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
याच तालुक्यात श्रीरामनगर येथील सचिन शिंदे 24 गुंठे क्षेत्रात शेती करतात. त्यांचे 54 हजाराचे कर्ज माफ झाले. यापुढे चांगली शेती करता येईल आणि शेती करताना उत्साह राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गारपीट, दुष्काळ, वादळामुळे पिकांचे सातत्याने नुकसान झाले. कार्याची चिंता होती.

शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतीसाठी नवी उमेद मिळाली. आता नव्या पद्धतीने शेती करेल, असा आशावाद गोरख हंडोरे यांनी व्यक्त केला. त्यांचे 76 हजाराचे कर्ज माफ झाले आहे. एकनाथ हंडोरे यांना मुलाचे उच्च शिक्षण पुर्ण करायचे आहे. मुलगा एमबीएला आहे. त्याच्या शिक्षणासाठी पैसे उसने घ्यावे लागत असतांना शेतीचे कर्ज फेडण्याची त्यांची चिंता कर्जमाफीमुळे दूर झाली. त्यांचे सोसायटीकडून दोन वर्षापूर्वी काढलेले 22 हजाराचे कर्ज माफ झाले आहे.

केपानगर, ता.सिन्नरच्या गोपीनाथ कातकाडे यांचे चार एकरात शेत आहे. त्यांनी सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी यापूर्वी बैलजोडीदेखील विकली. शासनाने कर्जमाफी केली नसती तर सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागले असते, असे त्यांनी सांगितले. त्यांचे 68 हजार रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. 

याच गावातील वसंत कातकाडे दहा एकर शेतावर शेती करताना नियमित कर्ज फेडत असल्याने त्यांना प्रोत्साहनपर 25 हजार सानुग्रह अनुदान मिळाले. यामुळे शेतकर्‍यांचा विश्‍वास वाढेल अशी त्यांची भावना आहे. कर्ज नियमित भरण्यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहनच आहे, अशा शब्दात भावना त्यांनी व्यक्त केली.