Breaking News

पत्नीला जीवंत जाळल्याच्या आरोपाखाली पतीस जन्मठेपेची शिक्षा

औरंगाबाद, दि. 14, डिसेंबर - दारूसाठी पैसे दिले न दिल्यामुळे रागाच्या भरात एका इसमाने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्यामुळे पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी ठोठावली. याप्रकरणी मृत्युपूर्वी पीडित महिलेने जबाब दिल्यामुळे घटनेचा उलगडा झाला आहे.


मृत महिलेचे नाव सीमा नसीब पठाण असून तिच्या आरोपी पतीचे नाव नसीब खान उस्मानखान पठाण आहे. नसीब खान हा सीमाकडे वारंवार दारुसाठी पैसे मागत असे, तसेच पैसे न दिल्यास तिला घराबाहेर काढून छळ करत असे. सिमा घर चालवण्यासाठी धुणी-भांड्याचेकाम करत होती. 


12 जानेवारी 2014 रोजी रात्री सिमा घरातील कामे आटोपून झोपली असता, आरोपी घरी आला व त्याने दारुसाठी पैसे मागितले. त्याला नकार देताच आरोपीने तिला शिवीगाळ व मारहाण करीत तिच्यावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. या प्रकारानंतर सासरा व मामाने तिला घाटीत दाखल केले.मात्र उपचारादरम्यान विवाहितेचा 17 जानेवारी 2014 रोजी मृत्यू झाला.