Breaking News

राज्यात नवीन एसएनसीयू स्थापन करण्यात येणार - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

नवजात बालकांवरील उपचारांसाठी राज्यात सध्या प्रत्येक जिल्ह्यात एक अशी एकूण 36 स्पेशल निओनॅटल केअर युनीट (एसएनसीयु) असून त्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.
बालमृत्यू तसेच माता व बालकांसाठी रुग्णालयांतील सुविधांच्या बाबत सदस्य हेमंत टकले यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रुग्णालयांमध्ये म्हणजेच संस्थात्मक बाळंतपणांमध्ये होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण खूप कमी आहे. गर्भवती मातांच्या घरी आदी प्रकारे रुग्णालयांच्या बाहेर होणाऱ्या बाळंतपणामध्ये होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. सध्याचा बालमृत्यूचा दर एकआकडीपर्यंत कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.

ते पुढे म्हणाले की, बालकांवरील उपचारासाठी नाशिक येथील राज्य शासनाच्या रुग्णालयात तसेच अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक याप्रमाणे दोन निओनॅटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयु) उभारण्यात येणार आहेत. राज्यातील मोठ्या खासगी कॉर्पोरेट रुग्णालयांचीही बालमृत्यू असलेल्या भागात बालकांवरील उपचारासाठी मदत घेण्यात येत आहे. 

त्याअंतर्गत मेळघाटात धारणी, चिखलदरा येथे शिबीरांचे आयोजन करण्यात येते. तसेच पालघर येथेही मुंबईतील मोठ्या रुग्णालयांकडून शिबीरे आयोजित केली जात आहेत.नाशिक येथे नवजात बालकांवरील उपचारासाठी 10 निओनॅटल ॲम्ब्युलन्स देण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.