Breaking News

अँकर अर्पिता तिवारीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल !


मुंबई : २५ वर्षीय अँकर अर्पिता तिवारीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर मालवणी पोलिसांनी बुधवारी या प्रकरणाचा सखोल तपास करून अर्पिताची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला असून, तिच्या आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद करून त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे. 
मालाड (प.), मालवणी येथील कच्चा रस्ता, मानव स्थळ बिल्डिंग १५ मजली इमारतीवरून उडी घेऊन मीरा रोड येथे राहणाऱ्या अर्पिताने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अर्पिताचा मित्र पंकज जाधव याच्या फ्लॅटमध्ये रविवारी रात्री पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अर्पिताबरोबर पंकजसह चार मित्र सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी अर्पिताचा मृतदेह पहिल्या मजल्यावरील मोकळ्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा आढळला होता. 

अर्पिताने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या मित्र-मैत्रिणींनी केला होता. पोलिसांनी प्रथम अपमृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली होती. मात्र, अर्पिताच्या कुटुंबीयांनी अर्पिता आत्महत्या करूच शकत नाही. तिला इमारतीवरून ढकलून हत्या केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.