Breaking News

डहाणू ते वैतरणामधील प्रवाशांना दिलासा


पालघर, दि. 01, डिसेंबर - पश्‍चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून सकाळवाजता सुटणारी आणि प्रवाशांमध्ये पहिली शटल म्हणून प्रचलित असलेली (59044) जी आता मेमू (69174) मधे रूपांतरीत झाली आहे. विरारपर्यंत जाणारी ही गाडी आता थेट बोरीवलीपर्यंत नेण्याची डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेची मागणी पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी मान्य करुन अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. सदर गाडीची फेरी बोरिवलीपर्यंत वाढविण्यात आल्याचे पश्‍चिम रेल्वेकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.

4.55 ला डहाणू वरून सुटणारी ही गाडी क्वचितच विरारला वेळेत पोहचत असे, त्यामुळे प्रवाशांना विरार पुढील प्रवास अतिशय त्रासदायक परिस्थितीत करावा लागत असे. विरारला गाडी पोहचताच, प्रवाशांना घाई गर्दीत उतरावे लागत असे, रेल्वेरूळ क्रॉस करणे, चालत्या गाडीत चढणे सारख्या जीवघेण्या कसरती कराण्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच कामावर नेहमी उशीरा पोहचणे, अलिकडेच आलेली बायोमेट्रीक हजेरी पद्धतीमुळे लेटमार्क, पगार कापणे इत्यादी समस्यांचा सतत सामना प्रवासी वर्गाला करावा लागत होता. ह्या समस्यामुळे त्रस्त झालेल्या लोकांना एकतर नोकरी सोडणे किंवा विरार पुढे रहायला जाणे हेच काय ते पर्याय उपलब्ध होते. प्रवाशांच्या समस्या विषयी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सह सचिव प्रथमेश प्रभुतेंडोलकर व सोबत परिचारीका असोसिएशनच्या रूत लिंगायत, लता भोईर व टिम यांनी वेळोवेळी प्रशासनासमोर गाड्या विस्तार करणे व इतर मागण्या प्रभावीपणे मांडल्या. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी तांत्रिक बाबींचा अभ्यास करून प्रशासनासमोर या गाडीची फेरी बोरिवली किंवा अंधेरी पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि विविध अधिका-यांच्या भेटी घेऊन त्यांना हा प्रस्ताव पटवून देण्याचेही काम केले होते.

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या विनंतीला मान देऊन पालघर 130 विधानसभा आमदार अमित घोडा यांनी प.रे.च्या मुख्यालयात महाप्रबंधकांकडे मागण्या संस्थेच्या पदा धिकार्यांना बरोबर घेऊन स्वतः सुपूर्द केल्या व त्याबाबत योग्य तो पाठपुरावा केला. या सर्व पाठपुराव्याचा विचार करीत रेल्वेप्रशासनाने लोक हितार्थ ह्या गाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. 69174 डहाणू विरार मेमू आता डहाणू ते बोरीवली हा बदल येत्या 1 डिसेंबर 2017 पासून अमलात येण्याची शक्यता आहे. गाडीची सकाळी डहाणू वरुन सुटण्याची वेळ 4.55 हिच ठेवण्यात आली असून विरारपर्यंत ही गाडी आधीच्याच वेळे नुसार पोहचेल. पुढे वसईला थांबा घेऊन 6 वाजून 35 मिनिटांनी बोरिवलीला पोहचेल आ णि पुन्हा बोरिवलीहून 6 वाजून 50 मिनिटांनी सुरतसाठी रवाना होऊन वसईला थांबा घेत 7 वाजून 28 मिनिटांनी विरार पोहचेल आणि सुरतसाठी 7 वाजून 40 मिनिटांनी सुरतसाठी रवाना होईल. प.रे.च्या मुख्यालयातुन याबाबतचे परिपत्रक मुंबई विभागाला पाठवण्यात आले होते. त्याचप्रमाणे मुंबई विभागाकडून अधिकृत घोषणा केली गेली.