Breaking News

शिक्षक परिषदेचे नागपुरला महाधरणे आंदोलन सुरु

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने हिवाळी अधिवेशन काळात नागपुर येथे पुकारण्यात आलेल्या तीन दिवसीय महाधरणे आंदोलनाला आज पासून प्रारंभ झाले. या आंदोलनात राज्यातील शिक्षकांनी सहभागी होवून शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. 


आंदोलनात शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आ.नागो गाणार, राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, मा.आ.संजीवनीताई रायकर, मा.आ.भगवान अप्पा साळुंखे, बाबासाहेब काळे आदिंसह राज्यातील संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
दि.13, 14 व 15 डिसेंबर रोजी चालणार्‍या महाधरणे आंदोलनात नगर मधील शिक्षक देखील हजेरी लावणार असून, शिक्षकांच्या प्रश्‍नाबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी. शासन निर्णय 23 ऑक्टोबर 2017 नुसार वरिष्ठ व निवड श्रेणीच्या संदर्भातील जाचक अटी रद्द कराव्यात. दि.1 नोहेंबर 2005 पासून शिक्षकेतरांचा आकृतीबंधाचा प्रलंबित प्रश्‍न तातडीने निकाली काढून, शैक्षणिक गुणवत्तेचा होणारा त्रास थांबविण्याच्या दृष्टीकोनाने शिक्षकेतरांचा आकृतीबंध त्वरीत लागू करावा. 

राज्यातील आयसिटी शिक्षकांना कायम करावे व त्यांना शाळेतील सर्व ऑनलाइनची कामे दयावीत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्वरीत 100 टक्के अनुदान दयावे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत आदि चोवीस मागण्यांसाठी शिक्षक परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.