Breaking News

जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवडणूक 23 डिसेंबरला

नाशिक, दि. 14, डिसेंबर - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर निवडीसाठी अध्यक्षपदाची निवडणूक 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बँकेच्या सभागृहात होत आहे. या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला असून जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 


जिल्हा बँकेचे अध्यक्ष दराडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपच्या संचालकांची नावे आघाडीवर आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकेला सावरण्यासाठी भाजपचा अध्यक्ष असावा, इच्छा सर्वच संचालकांनी व्यक्त केल्यामुळे भाजपच्या संचालकांमध्ये अध्यक्ष होण्यासाठी चढाओढ आहे. बँकेत भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, माणिकराव कोकाटे, केदा आहेर हे चार संचालक असून त्यांना परवेझ कोकणी व संदीप गुळवे यांची साथ मिळाली आहे. 

परवेझ कोकणी यांनी तर त्र्यंबकेश्‍वर पालिका निवडणुकीत भाजपला मदत करून तेथे नगराध्यक्षही निवडून आणला असल्याचे वातावरण पक्षामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे वजन वाढले आहे. माजी अध्यक्ष मा णिकराव कोकाटे यांनीही पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यांनीही बहुमताचे गणित गाठण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे.


कोकणी व कोकाटे यांच्यातील दुरावा पाहता आपणच मान्य उमेदवार म्हणून आपणच सर्वमान्य उमेदवार होऊ शकतो,अशा आशेवर केदा आहेर आहेत. 19 संचालकांमध्ये अध्यक्ष होण्यासाठी आवश्यक असणारा 10 चा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांनी तयारी केली आहे. आहेर भाजपमध्ये असले तरी त्यांचे सर्वपक्षांमध्ये चांगले संबंध असल्यामुळे बहुमताचे गणित जुळवून आणण्याबाबत त्यांना विश्‍वास आहे. 

भाजप नेत्यांनी बहुमताचे गणित जुळवून आणल्यास व पक्षाने संधी दिल्यास खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण व आमदार सीमा हिरे यांचीही अध्यक्ष होण्याची तयारी आहे. मात्र अध्यक्षपदाचा उमेदवार पालकमंत्री गिरीश महाजन ठरविणार असल्याने या पैकी एकही संचालक उघडपणे अजूनही बोलण्यास तयार नाही, असेच काहीसे चित्र आहे.