Breaking News

पेट्रोल, डिझेल महागणार


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असून मंगळवारी या तेलाच्या दराने मागील अडीच वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय खनिज तेल बाजारात २४ जून २०१५ नंतर प्रथमच खनिज तेलाला प्रतिपिंप ६५.७० डॉलर दर देण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात खनिज तेल आणखी भडकणार असल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल इंधनांचे दर भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. 
खनिज तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मागील सहा महिन्यांचा विचार करता कच्च्या तेलाच्या दरात ४७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. जूनमध्ये कच्चे तेल प्रति बॅरल ४४.४८ डॉलरवर पोहोचले होते. ब्रेंट क्रूडच्या दरांमध्ये वाढ झाल्याने भारतातील इंधनविक्री करणाऱ्या कंपन्यांवरील दबाव वाढत आहे. कच्चे तेल भडकत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याच्या शक्यतेने इंधनविक्री करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी घसरण दिसून आली.