Breaking News

अहमदनगर महानगरपालिकेची उलटसुलट कामे

अहमदनगर / प्रतिनिधी :- शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असताना दिसून येत आहे. रस्त्यांची रस्त्यामध्ये खड्डे की, खड्डयात रस्ते अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्येच सुस्थितीत असलेले रस्ते खांदून त्या रस्त्याची पुरती वाट लावली आहे. काही दिवसांपुर्वी शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये असणारा रस्ता खांदण्यात आला. रस्ता खांदणार्‍या कामगारांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, समर्थनगर परिसरातील पाण्याच्या टाकीला पाणी सोडण्यासाठीचा व्हॉल्व या रस्त्याखाली दडपला गेला असून तो शोधण्यासाठी रस्ता खांदत आहोत. 


हा व्हॉल्व सापडल्यानंतर उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून देवू असे संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून सांगण्यात आले होते. परंतु दहा बारा दिवसांचा कालावधी लोटून देखील तो व्हॉल्व सापडला नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर तो खांदलेला रस्ता देखील तसाच सोडून दिला आहे. त्याचे दुरूस्तीचे कामदेखील केले नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची परिस्थिती हालाकीची आहे, त्यातच काही महिण्यांपुर्वी काम झालेल्या रस्त्यामध्ये सदर व्हॉल्व झाकला गेला आहे. मग आज महानगरपालिका अधिकार्‍यांना त्याची गरज पडली, मग तेंव्हा जाग आली आणि त्यासाठी ब्र्रेकरच्या सहाय्याने रस्ता खांदण्याचे काम केले. त्या ठिकाणी व्यवस्थित झालेल्या रस्त्याची दुरावस्था करण्यात आली. 

मग या रस्त्याचे काम सुरू असतानाच खबरदारी घेतल्यास हा खटाटोप करण्याची आवश्यकता भासली नसती, परंतु याठिकाणी असणार्‍या व्हॉल्वची आज बुरूडगाव परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था करण्यात आली आहे. शहरातील सोयी सुविधांसाठी आवश्यक असणारा निधी महापालिकेकडे उपलब्ध नसतो, परंतु अशा स्वरूपातील म्हणजेच एकाच कामासाठी निधी खर्च केला जात असेल आणि सुस्थितीत असलेल्या रस्त्याची दुरावस्था होते हे तर वेगळेच. त्याचबरोबर रस्त्याच्या रहदारीला अडथळा होतो. यातुनच पालिका अधिकार्‍यांना उलटसुलट पद्धतीने कामे करण्याची सवय लागल्याचे दिसून येत आहे.