Breaking News

वेगळ्या मराठवाड्याच्या प्रस्तावाला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नाही.


वेगळ्या मराठवाड्याच्या प्रस्तावाला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच या सरकारमध्ये युतीत काहीच वाद नाही. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमची छोट्या राज्याची संकल्पना असली तरी केवळ एका गावाचे राज्य कसे करणार, असा सवाल त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. जे राज्य सक्षम असेल त्या राज्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देता येईल. मात्र मराठवाड्याकडे उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळे ते वेगळे राज्य सक्षम होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र मराठवाड्याच्या विकासाकडे आमच्या सरकारचे लक्ष असल्याचे ते म्हणाले. 


विधान परिषदेच्या निवडणुकीत बाहेरून आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की, केवळ राजकीय मजबुरी म्हणून, असा निर्णय घ्यावा लागतो. मात्र भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली. ते काय आम्हाला प्रसाद देणार, आम्हीच त्यांना प्रसाद दिला आहे. मात्र भाजपाचे ८४ टक्के आमदार हे बाहेरून आलेले नाहीत, तर भाजपाचेच जुने कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले.