Breaking News

पॅन कार्ड क्लबने ५० लाख जणांचे ७ हजार कोटी बुडवले

पॅन कार्ड क्लब संस्थेने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली सुमारे ५० लाख गुंतवणूकदारांना तब्बल ७०३५ कोटींना गंडवले असल्याचा घोटाळा आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) उघड केला आहे. .शेअर बाजार नियामक सेबी संस्थेने याआधीच पीसीएल कंपनीस कोणतीही संपत्ती न विकण्याचे आदेश दिले आहेत. 


तसेच या कंपनीचे संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे फेडण्यासाठी सेबीने निवृत्त न्या. आर. एम. लोढा यांच्या यांची नियुक्तीदेखील केली आहे. ईओडब्ल्यू विभागाने पॅन कार्ड क्लब कंपनीच्या विरोधात भारतीय दंडसंहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच पॅन कार्ड क्लबच्या सहा संचालकांच्या विरोधात महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (एमपीआयडी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीसीएल कंपनीचे प्रभादेवीतील मुख्यालय आता बंद आहे. दादर येथील एक रहिवासी नरेंद्र वाटावकर यांनी १० डिसेंबर रोजी पीसीएल कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 

सेबीने पीसीएल कंपनीच्या ३४ संपत्ती आधीच जप्त केल्या असून ३५० बँक खातीदेखील गोठवली आहेत. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये भूखंड, रिझॉर्ट, इमारती आणि देशभरातील कार्यालयांचाही समावेश आहे. पीसीएल कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणारे बहुतांश गुंतवणूकदार हे मध्यम वर्गीय कुटुंबातील आहेत.