Breaking News

पो.नि. बाजीराव पोवार सह तीन हवलदारांचा सन्मान

श्रीगोंदा/प्रतिनिधी / :- खून करून फरारी झालेले चार आरोपी श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल उत्तम राऊत, पोलीस कॉन्स्टेबल किरण बोराडे यांनी पाचव्या दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर २०१७ च्या रात्री पकडून सातारा पोलीस पथकाच्या ताब्यात दिल्याबद्दल साताराचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या चौघांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले.


सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे सुहेल मुल्ला यांच्या घरावर २१ नोव्हेंबर २०१७ च्या रात्री दरोडा टाकून ४ लाख ९३ हजार ५०० रुपयांचे सोने चोरून व सुहेलची आजी जैबून करीम मुल्ला ( वय ८६ वर्षे ) यांचा खून केल्याची घटना घडली होतील. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्र शांतता कमिटीच्या सभेत संबधितांना प्रदान करण्यात आले.

ईद मिलादच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शांतता कमिटी, पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त सभेत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी उंब्रज ( जि. सातारा ) दरोड्याची माहिती दिली.या दरोड्यात  मांडवगण ता. श्रीगोंदा येथील दोन, वडघुल येथील एक आणि नगर तालुक्यातील परमपूरवाडीचा एक असे चार आरोपी पकडण्यात आले.त्यात मांडवगणचा इनोव्हा गाडीचा मालकही श्रीगोंदा पोलिसांनी गाडीसह ताब्यात घेऊन या सर्वांना सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. 


कर्जत पोलीस उपाधिक्षक दरोडा पथकातील हेड कॉन्स्टेबल अंकुश राजाराम ढवळे ( रा. हिरडगाव ) यांनी यापूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील पोथरे,वीट,आणि कंदर तसेच मोहोळ तालुक्यातील कामठी येथील दरोड्यातील आरोपी पकडून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. म्हणून सोलापूरचे पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांनी आणि पुणे जिल्ह्यातील धामणे ( ता. मावळ ) व शिक्रापूर येथील दरोड्यातील आरोपी पकडून दिल्याबद्दल पुण्याच्या प्रभारी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कॉ. अंकुश ढवळे यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले होते.