Breaking News

विधिमंडळ सचिवालय आजपासून सुरू होणार


नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. यानिमित्ताने प्रशासन डेरेदाखल झाले असून २ डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू होणार आहे. तर, सोमवारपासून विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकडून ऑनलाइन लक्षवेधी स्वीकारण्यात येणार आहेत.
संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ सामील झाला, त्यावेळी नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले आहे. यंदा हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अधिवेशनादरम्यान नेहमीप्रमाणे सहाशे ते सातशे कर्मचारी नागपुरात दाखल होत असतात. शुक्रवारी (१ डिसेंबर) अनेक कर्मचारी नागपुरात आले. २ डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाचे ग्रंथालय, प्रश्न शाखा सुरू होत आहेत. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकडून ऑनलाइन लक्षवेधी सोमवारपासून स्वीकारण्यात येतील, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिली.