Breaking News

मराठा आरक्षणासाठी शासनाची भूमिका सकारात्मक - चंद्रकांत पाटील


मराठा समाजाला आरक्षण आणि अन्य सुविधा देण्याच्या संदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक असून त्यासाठी अनेक योजना शासनाने सुरु केल्या आहेत. असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात सदस्य शरद रणपिसे यांनी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना श्री.पाटील बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट असून मागासवर्गीय आयोग वेगाने काम करीत आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 36 जिल्ह्यात वसतिगृह सुरु करण्यासाठी शासन स्तरावर वेगाने कार्यवाही सुरु असून अनेक संस्थांना जागा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


मराठा समाजातील युवकांना उद्योग सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज देण्याची सोय केलेली आहे. तसेच कर्ज प्रकरणे सुलभरित्या मार्गी लागण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात एका शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. 

तर सारथी या संस्थेमार्फत डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या परंपरा आणि चालीरितीचा अभ्यास सुरु आहे. दर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि विविध निर्णयावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक नियमित होत आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.