Breaking News

तीन तलाक आता ठरणार गुन्हा !


तीन तलाकला अवैध व अमान्य ठरवण्यासोबत असे करणाऱ्या पतीला तीन वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद असलेल्या प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान हे विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे.
पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी तीन तलाक पद्धतीचा अवलंब करणाऱ्या मुस्लिम पुरुषास तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद यात आहे. यानुसार तीन तलाक देणे हा अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा ठरणार आहे. या विधेयकामुळे पीडित महिलांना योग्य पोटगी तसेच अपत्यांचा ताबा मिळण्यास मदत होईल. विधेयकानुसार तोंडी, लिखित, एसएमएस, ई-मेल, व्हॉट्सॲप अशा कोणत्याही माध्यमातून तीन तलाक देणे अवैध असेल. मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्रिमंडळाने विचार करून आपली मंजुरी दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.