Breaking News

आयुक्तांनी टीडीआरबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करावा - आ. आव्हाड

ठाणे, दि. 24, डिसेंबर - ठाणे शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना यापुढे विकास हस्तांतर हक्क (टीडीआर) देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे. मात्र, शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आयुक्तांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे सूचवतानाच आयुक्तांना वैयक्तीक पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न एका राजकीय पक्षाकडून होत असून राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणात आयुक्तांच्या पाठीशी आहोत, असे आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 


तीन हात नाका येथील वंदना सोसायटीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर महापालिकेच्या शहरविकास विभागाने तब्बल 200 कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा केल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेपुढे केला होता. यापूर्वी भाजपच्या शहरातील काही पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीचे आरोप केले होते. त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्त जयस्वाल यांनी ठाणे शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना यापुढे विकास हस्तांतर हक्क (टीडीआर) देता येणार नाही, असे सांगितले. त्याबाबत आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये, भाजपला आकडे फुकवून सांगण्याची सवय आहे. गावापासून दिल्लीपर्यंत आकडे फुगवून सांगण्याचे काम भाजप करीत आहे , हे टूजी ते टीडीआरमध्ये दिसून आले असून जनतेला संभ्रमात ठेवण्याचे काम भाजपने केले आहे. प्रत्यक्ष त्यांनी फुगवून सांगितलेल्या आकड्यांमध्ये आणि सत्यामध्ये क ाहीच चुकीचे नव्हते, हे स्पष्ट झाले आहे, असे सांगितले.