Breaking News

‘फडणवीस सरकार चले जाव’ इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा

पैठण प्रतिनिधी-राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते आणि माजी आ. संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जनतेच्या हितार्थ धोरण राबवित फडणवीस सरकारला पैठणमध्ये ‘चले जाव’चा इशारा देण्यात आला. 


‘खड्डेच खड्डे रस्त्यावर, सरकार नाही भानावर’, ‘खोटी आश्वासने, फसव्या जाहिराती - जनतेच्या माथी मी लाभार्थी’, ‘पेट्रोल-डिझेल-गॅस महाग, मरण स्वस्त जगणं महाग’ अशा घोषणांनी मार्केट कमेटी ते मोर्चाचा मार्ग दुमदुमला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘फडणवीस सरकार चले जाव’चा इशारा दिला. भाजप आणि सेनेचे सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे, आवाहन यावेळी करण्यात आले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.

दरम्यान, गेल्या ३ वर्षापासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन भाजप सरकारने व अकार्यक्षम मंत्र्यांनी राज्याच्या जनतेची फसवणूक केली आहे, असे प्रतिपादन यावेळी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केले. ते म्हणाले, की भाजपा सरकारने आता शेतकऱ्यांना आणखी एक काम लावले आहे. कपाशीवर बोंड अळ्या पडल्या तर पंचनाम्यासाठी कपाशीचे बिल द्या. फडणवीस सरकारच्या या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाद्वारे निषेध नोंदविण्यात आला.


 दि. ३० नोव्हेंबरपासून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात भाजप-शिवसेना सरकारविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. नेहमीच शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गाच्या न्याय व हक्कांसाठी लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरात सुरू केलेल्या सरकारच्या नाकर्तेपणा व असंवेदनशीलतेविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे.

केंद्रातील सरकारच्या नोटबंदी व जी.एस.टी. (Gst) च्या आततायी निर्णयामुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून करण्यात आलेल्या आंदोलनात कोते यांच्यासह माजी आ. संजय वाघचौरे, विजय गोरे, अरूण काळे, भाऊसाहेब तरमळे, किशोर तावरे, अनिल हजारे, राम आैटेंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.