Breaking News

बळीराजाला निसर्गाने दिले ; मात्र महावितरणने नेले

नगर ता. प्रतिनिधी :सतत तीन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी मेटाकुटीला आला होता. यंदा वरुणराज्याने साथ दिल्याने कांदा, कापूस, ज्वारी आदी पिकांनी शेतजमीन बहरली आहे. मात्र कमी दाबाने होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. पिके जोमात असल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र निसर्गाच्या कृपेने मुबलक पाणीसाठा मिळूनही वीजेच्या गोंधळामुळे शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे निसर्गाने भरपूर दिले मात्र महावितरणने नेले, असे म्हणण्याची वेळ हताश शेतकऱ्यांवर आली आहे.


विद्युत मोटार दुरुस्तीसाठी होणारा खर्च न परवडणारा असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत पुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक शेतकर्यांनी इंजिनद्वारे शेतीला पाणी देण्यास सुरवात केली आहे. मात्र यासाठी लागणारा खर्च हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत जात आहे.


 मात्र पिके जगवण्यासाठी सध्या नगर तालुक्यातील शेतकरी यासाठी हवी ती किंमत मोजण्यास केवळ नाईलाजास्तव तयार असल्याचे दिसत आहे. अनेक शेतकर्यांनी दिवसरात्र मेहनत करून कापूस जगवला. मात्र अनेक ठिकाणी कापसावर बोंडअळी, मावारोग, बोंड खराब होणे यासारख्या समस्या वाढल्या. परिणामी अनेकांची पिके वाया गेली आहेत. ज्या पिकांचे उत्पादन शेतकर्यांनी घेतले, त्याला अजिबात हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

धरण उशाला अन् कोरड घशाला
नगर तालुक्यात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तलाव, नाले तुडुंब भरले आहेत. कापूरवाडी, भातोडी पारगाव, चिंचोणी पाटील आदी तलावांत सध्या बऱ्यापैकी पाणी आहे. मात्र तरीदेखील शेतातील पिकांनी पाणी देण्यासाठी बळीराजांना मोठा आटापिटा करावा लागत आहे. धरण {तलाव} उशाला अन कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ सध्या नगर तालुक्यातील शेतकर्यांवर आली आहे.