Breaking News

बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करणार.


बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांकडून, विम्याद्वारे तसेच एनडीआरएफमार्फत मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आत शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी मदत जाहीर करण्यात येईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत सांगितले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सर्वश्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, अमर काळे, अस्लम शेख, ॲड. यशोमती ठाकूर आदींनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास उत्तर देताना मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.

मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, राज्यातील 5 लाख 2 हजार 212 इतक्या शेतकऱ्यांनी बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागास कळविले आहे. याशिवाय महसूल विभागामार्फत बोंडअळीग्रस्त कापूस क्षेत्राचे पंचनामे सुरु आहेत. हे पंचनामे पूर्ण झाले की बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांकडून, विम्याद्वारे तसेच एनडीआरएफमार्फत मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. राज्यात 42.06 लाख हेक्टरवर यंदा कापूस लागवड झाली असून त्यापैकी 98 टक्के क्षेत्र हे बीजी – 2 या बीटी कापूस पिकाखालील आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.