Breaking News

विकासकामांचे उदघाटन आ. कर्डिलेंनी रद्द केले : तनपुरे


राहुरी प्रतिनिधी - नगरपालिकेच्यावतीने जोगेश्वरी आखाडा येथे अडीच कोटी रूपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत होणार होता. परंतु, हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी तालुक्याचे लोकपतिनिधी आ. शिवाजी कर्डिले यांनी वरिष्टांकडून मंत्र्यांवर राजकीय दबाव आणला आणि हा कार्यक्रम रद्द केला, असा आरोप नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला.
तनपुरे म्हणाले, की 13 व्या वित्त आयोगातून नवीन जलकुंभासाठी वितरण व्यवस्थेची उभारणी करणे व चाचणी देणे तसेच येवले आखाडा येथे राज्य मार्ग ते येवले आखाडा रस्त्याचे डांबरीकरण आदी कामांचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्याचे पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तसेच शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी खा. प्रसाद तनपुरे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार होते. मात्र आ. कर्डिले यांनी राजकीय हेतुने कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले. वास्तविक पाहता राज्याचे पाणी पुरवठा लोणीकर यांनी कोणताही राजकीय हेतु न ठेवता केवळ तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्याचे दृष्टीने नगरपालिकेचा कार्यक्रम घेतला होता. 

या कार्यक्रमात राहुरी शहराच्या २९ कोटी रूपये खर्चाच्या सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूरीबाबत चर्चा करण्यात येणार होती. तसेच तालुक्यातील कुरणवाडीसह ९ गावांच्या पाणी योजनेसह मतदारसंघातील रखडलेल्या पाणी योजनाच्या प्रश्नाबाबत संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा होणार होती. परंतु केवळ श्रेयवादातूनच आ. कर्डिले यांनी त्यांच्या मतदारसंघात न विचारता कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आक्षेप घेतला.