Breaking News

आतापर्यंत ४८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर - मुख्यमंत्री


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास ४८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर करण्यात आली असून आजपर्यंत त्यापैकी २६ लाख ५०० शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्यक्ष रक्कम जमा झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकरी यांना मदतीसंदर्भात आणि दुष्काळासंदर्भात हे अधिवेशन संपण्याच्या आत निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, विजय वडेट्टीवार आदींनी नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या प्रकरणातील सुमारे ३४ लाख खाती ही संपूर्ण कर्जमाफीची असून १३ लाख १७ हजार खातेधारकांना प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मागच्या अवघ्या साधारण ६ दिवसात ४ लाख ७२ हजार २२७ इतक्या खात्यांना कर्जमाफी मंजूर करण्यात आली. आतापर्यंतच्या कर्जमाफीची एकूण किंमत ही साधारण २३ हजार ३०० कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.