Breaking News

देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत - खा. अशोक चव्हाण

मुंबई, दि. 21, डिसेंबर - पंतप्रधान, भाजपाध्यक्षांसह निम्मे मंत्रीमंडळ आणि 13 राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रचारसभा घेऊन, सत्ता आणि पैशाचा प्रचंड गैरवापर करूनही भाजपच्या जागा गुजरातमध्ये घटल्या आहेत, तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेल्या काँग्रेसच्या पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत आणि जागांमध्ये वाढ झाली आहे. यावरून देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत हे स्पष्ट झाले असून राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भाजपला पराभूत करेल, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज व्यक्त केला. 



गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर राज्य सरकार अधिक स्थिर झाले असे वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खा. चव्हाण बोलत होते.केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जनतेत प्रचंड असंतोष असून आज निवडणुका झाल्या तर राज्यात सत्ता परिवर्तन होईल आणि भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल, असा टोला लगावला. देशभरात भाजपच्या विरोधात जनतेत प्रचंड संताप आहे, हे गेल्या काही दिवसांत झालेल्या पोटनिवडणुका आणि गुजरात निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर समाजातील एकही घटक समाधानी नाही. खुद्द भाजपचे नेते, आमदार आणि खासदार सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने करित आहेत, असेही खा. चव्हाण म्हणाले.