Breaking News

बोंड अळीच्या पार्श्वभूमीवर रामगिरीवर उच्चस्तरीय बैठक


बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उत्पन्न झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रामगिरी येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील आणि राज्याच्या प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी दिली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता पुढच्या वर्षीसाठी घ्यावयाची काळजी आणि त्यासाठी करावयाचे उपाय यावर सुद्धा या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. यातून उद् भवलेल्या किटकनाशक फवारणीच्या समस्या बाबतही चर्चा झाली. शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करुन देण्याची गरज यावरही भर देण्यात आला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बोंड अळी प्रादुर्भावासंदर्भात आपले मत मांडले. कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांनी सुद्धा आपली मते व्यक्त केली. या सर्व सूचनानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्याला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.