भारत भ्रमंतीवर असलेल्या दिव्यांग सायकलीस्टस प्रदीपकुमार सेनचा नाशिकमध्ये गौरव
दिव्यांग हित, स्वच्छ भारत, पर्यावरण संवर्धन असे विविध बाबींचा प्रचार करत 27 वर्षीय प्रदीप कुमार 15000 किमीचा प्रवास सायकलवर करणार आहे. याद्वारे तो गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदविण्याच्या तयारीत आहे. यासाठी प्रदीप 14 नोव्हेंबर पासून या यात्रेसाठी निघाला आहे. या प्रवासादरम्यान 35 किलोची बॅग सोबत घेऊन तो सायक लवर प्रवास करत आहे. नाशिक शहरात झालेले स्वागत बघून प्रदीप भारावला होता.
प्रदीपची भारत भ्रमंती अनेकांना प्रेरणा देऊन जाणारी असून वेगळे काही करण्यासाठी त्याने सायकल वरचा प्रवास निवडल्याने पर्यावरण, दिव्यांगाबाबतचा संदेश पोचण्यास वेळ लागणार नसल्याची प्रतिक्रिया नाशिक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी दिली आहे.
डॉ. मनीषा रौन्दल यांनी प्रदीपची वैद्यकीय तपासणी करून देत त्याला पुढच्या प्रवासासाठी नव्याने उर्जा दिली आहे. त्यांनी सायकल प्रवासात लागणारे साहित्यही प्रदीपला भेट दिले आहे. आज सकाळी प्रदीप पुढील भ्रमंतीसाठी घोटीच्या दिशेने रवाना झाला आहे.यावेळी सेन समाज ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र टोकशिया, राजेंद्र तंवर यांच्यासह प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष सचिन पानमंद, बबलू मिर्झा उपस्थित होते. प्रहर संघटनेचे प्रशस्तीपत्र देऊन प्रदीपला गौरविण्यात आले.