Breaking News

नागरी सुविधा व घरपट्टी प्रश्‍न सोडविण्याची विरोधी पक्षनेत्यांकडे भारिपची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव, गांधीनगर चोभे कॉलनी येथील नागरिकांना पंधरा वर्षापासून नागरी सुविधा मिळत नसताना, चुकीच्या पध्दतीने आकारलेल्या घरपट्टीच्या प्रश्‍नांबाबतचे निवेदन भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मनपा विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांना देण्यात आले. बोराटे यांनी उपायुक्त दराडे यांच्याशी चर्चा करुन, स्थायी समितीत हा विषय घेवून प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

बोल्हेगाव चोभे कॉलनी येथील नागरिकांना पंधरा वर्षापासून नागरी सुविधा मिळत नसून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी घरपट्टीची मागणी केल्यावर त्यांना चुकीच्या पध्दतीने घरपट्टी आकारण्यात आली. मध्यमवर्गीय कुटुंबाची लोकवस्ती असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना बारा ते चौदा हजाराची घरपट्टी आकारण्यात आली. या थकित घरपट्टीवर दरमहा व्याज लावण्यात येत आहे. या संदर्भात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने वेळोवेळी आवाज उठवून, मनपा प्रशानास्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे भारिपचे ज्येष्ठ नेते सुनिल शिंदे यांनी स्पष्ट केले.
या भागातील नागरिकांनी चालू वर्षाची घरपट्टी भरली. महापालिकेने दंड (शास्ती) माफ करुन, योग्य घरपट्टी आकारल्यास नागरिक ती पुर्णत: भरण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तातडीने घरपट्टीचा प्रश्‍न मार्गी लावावा. तसेच या भागात रस्ते, पाणी व पथ दिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावेळी सुनिल शिंदे, आसीर सय्यद, किसन भिंगारदिवे, दिलीप साळवे, भाऊसाहेब कोहकडे, बाळासाहेब कसबे, महादेव माने, मंगल परहार, सुभाष पालवे, प्रविण जाधव, उषा राऊत, पारुबाई औटी, उज्वला माळवे, मंदाबाई कांबळे, मनिषा नाईक, शोभा पालवे, उषा उमाप, शोभा खरात,नजमा शेख, आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.