Breaking News

देशभरातील बीएसएनएलचे कर्मचारी जाणार संपावर

पुणे, दि. 12, डिसेंबर - दूरसंचार सेवा देणारी सरकारी कंपनी बीएसएनएलला संपविण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप बीएसएनएल कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे देशभरातील बीएसएनएलचे कर्मचारी 12 व 13 डिसेंबरला संपावर जाणार आहेत.


मूळ बीएसएनएल कंपनीचे केंद्र सरकार तुकडे करीत आहे. हे तुकडे केल्यानंतर बीएसएनल कंपनी ही बड्या उद्योजकाला विकण्याचा सरकारचा घाट असल्याचा आरोप बीएसएनएल कर्मचारी संघटनेने केला आहे. बीएसएनएलने निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांना विश्‍वासपूर्ण सेवा देणारी दूरसंचारमधील एकमात्र असलेली बीएसएनएल कंपनी जिवंत राहावी, म्हणून हे आंदोलन केले जाणार आहे. 

अन्यथा देश चांगल्या, विश्‍वासपात्र दूरसंचार सेवेला मुकणार आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ कर्माचारी वर्ग संपावर जाणार आहे. सर्व बीएसएनएलच्या सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, प्रलंबित तिसरे रिव्हिजन वेतन देण्यात यावे, अशीही संघटनेने मागणी केली आहे. बीएसएनएलमधील बहुतांशी कर्मचारी हे 50 ते 52 वर्षांचे असल्याने त्यांच्या आयुष्यातील हे शेवटचे पे रिविजन असणार आहे. हे दुसरे पे रिविजन लवकरात लवकर लागू करावे, ही प्रमुख मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.