Breaking News

दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच सहकारी दूध संघांचे प्रश्नही सोडवू - मुख्यमंत्री


दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि त्याच वेळी सहकारी दूध उत्पादक संघही टिकले पाहिजेत यादृष्टीने हिवाळी अधिवेशन काळातच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या विषयावरील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आमदार सर्वश्री सुनिल शिंदे, विजय वडेट्टीवार, नसीम खान, अमीत देशमुख, अमीन पटेल, सुनिल केदार आदींनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर २७ रू. इतका दर सहकारी दूध संस्थांनी द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. सहकारी दूध संस्थांनी इतका दर देण्यास असमर्थता दर्शविली असून अनेक सहकारी संस्था सध्या हा दर देत नाहीत. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सहकारी दूध संस्थांनी त्यांच्या प्रशासकीय व इतर खर्चावर नियंत्रण न आणता शेतकऱ्याला दुधासाठी मिळणाऱ्या दरावर नियंत्रण आणणे हे अन्यायकारक आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत चांगला दर मिळणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी सहकारी दूध संस्थाही अडचणीत येणार नाही याबाबत शासन निश्चितच योग्य कार्यवाही करेल, असे त्यांनी सांगितले.