Breaking News

रामसेतू मानवनिर्मित ? मुद्यावरून राजकारण तापले

रामसेतूच्या अस्तित्वाला आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानानेही मान्य केल्यानंतर देशात आता या मुद्यावरून राजकारण तापले आहे. वाल्मिकी रामायणानुसार प्रभू श्रीराम सीतेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी लंकेवर स्वारी करण्यासाठी निघाले. यावेळी वाटेतील समुद्र पार करण्यासाठी वानरसेनेने श्रीलंकेपर्यंत पूल उभारला. रामसेतू म्हणून ओळखली जाणारी ही संरचना नैसर्गिक की मानवनिर्मित असा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. 


दगड आणि रेतीची ही संरचना नैसर्गिक असल्याचा दावा काही राजकीय नेते करत आले आहेत. परंतु भाजपसह हिंदुत्ववादी संघटना रामसेतू म्हणजे रामायण काळात बांधलेला पूल असल्याचा दावा करत त्याचे जतन करण्याची मागणी करत आले आहेत. या दाव्याला अमेरिकेतील सायन्स चॅनलच्या एका व्हिडीओने बळ मिळाले आहे. 

या व्हिडीओमध्ये भूगर्भशास्त्रज्ञ रामसेतू हा मानवनिर्मित असल्याचे सांगत आहे. नासाच्या उपग्रहाने घेतलेली छायाचित्रे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारावर भारताचे धनुष्यकोडी ते श्रीलंकेच्या मन्नार बेटादरम्यान उभारण्यात आलेली संरचना मानवनिर्मिती असल्याचे स्पष्ट होत आहे. या मार्गात असलेल्या छोट्या-छोट्या बेटांना जोडून हा सुमारे ४२ किमीचा मार्ग तयार करण्यात आला आहे.