Breaking News

दीनदयाल थाली हा रुग्णसेवेचा पुढचा टप्पा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर : ‘दीनदयाल थाली’ हा अत्यंत चांगला प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णसेवेतील पुढचा टप्पा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय परिसरात युवा झेप प्रतिष्ठानच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या स्वस्त भोजन योजनेच्या प्रकल्पाचे लोकार्पण आज केंद्रीय सडक परिवहन, जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात मुख्यमंत्री बोलत होते.

या कार्यक्रमास नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, महापौर नंदा जिचकार, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर कोहळे, ना.गो.गाणार, अनिल बोंडे, कृष्णा खोपडे व रुग्णालयाचे अधिष्ठाता अभिमन्यू निसवाडे तसेच युवा झेप प्रतिष्ठानचे व मनपा सत्ता पक्ष नेता संदीप जोशी आदींनी प्रमुख उपस्थिती होती.

गोरगरिबांच्या सेवेसाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य मोहिमेअंतर्गत हजार आजारांवर मोफत उपचार राज्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विविध ठिकाणी होत असणाऱ्या आरोग्य शिबिरांमधूनही लाखो जणांची उपस्थिती दिसते. या सर्वांची केवळ तपासणी न करता त्यांच्या आजारांवर उपचार करुन त्यांना आरोग्यसंपन्न स्थितीत घरांपर्यंत पोहचविण्याचे काम शासन करीत आहे.

मेयो रुग्णालयासाठी देखील याच स्वरुपात प्रकल्पाचा प्रस्ताव आलेला आहे. याच प्रकारे राज्यात रुग्णांच्या नातेवाईकांना कमीत-कमी दरात जेवण उपलब्ध करुन देणाऱ्या स्वयंसेवी संस्था समोर आल्यास त्यांना जागा उपलब्ध करुन देण्याचा विचार आरोग्य विभागाने करावा, असेही फडणवीस म्हणाले.