Breaking News

खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा हृदयविकाराने मृत्यू.


भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी येथील बहुचर्चित हत्याकांडातील मुख्य सहा आरोपींपैकी एकाचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगताना मृत्यू झाला आहे. विश्वनाथ हगरू दांडे (६५, रा. खैरलांजी) असे मृतकाचे नाव आहे. विश्वनाथ नागपूर मध्यवर्ती कारागृहात २५ वषांर्ची शिक्षा भोगत होता. त्याला हृदयविकाराचा आजार होता. 

एप्रिल २०१७ मध्ये त्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. तेव्हापासून तो आजारी राहायचा. त्याची २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास प्रकृती बिघडल्याने त्याला तत्काळ मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री १०.४८ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. खैरलांजी येथील काही लोकांनी आपसी वादातून २९ सप्टेंबर २००६ रोजी भैय्यालाल भोतमांगे यांच्या घरावर हल्ला करून सौ. सुरेखा भोतमांगे, त्यांची मुलगी प्रियंका, मुलगा सुधीर व रोशन या चौघांची हत्या केली. 

या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने २४ सप्टेंबर २००८ रोजी विश्वनाथ दांडेसह सहा आरोपींना फाशी, २ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून, तीन जणांची सुटका केली. नंतर हायकोर्टाने २४ जुलै २००६ रोजी ६ आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून २५ वर्षाची शिक्षा ठोठावली.