Breaking News

'मुथ्थुट फायनान्स'मध्ये सुवर्ण घोटाळा


मुथ्थुट फायनान्स नागरिकांचे सोने तारण ठेवून कर्ज देते. कर्जासाठी बँकेप्रमाणे जास्त धडपड करावी लागत नसल्याने गरजू लोक आपल्याकडील सोने तारण ठेवतात. सदर कंपनी सोन्याची शहानिशा करून कर्ज देते. वाडी येथील शाखेत १४०० नागरिकांचे खाते असून त्यांनी सोने तारण ठेवून कर्ज घेतले. या कंपनीच्या काही खातेदारांनी सदर वित्त संस्थेचे कर्ज परत केले व तारण ठेवलेले सोने परत घेतले. 

फरार व्यवस्थापक थॉमस याने कर्जदारांकडून कर्जाची रक्कम परत घेतल्यानंतर त्यांचे सोने परत केले. पण, त्या सोन्याच्या ठिकाणी नकली सोन्याचे दागिने, प्लास्टिकचे दागिने कंपनीच्या लॉकरमध्ये ठेवून परत आलेली कर्जाची रक्कम परस्पर फस्त केली. 

या वित्त संस्थेच्या ऑडिटकरिता दिल्ली येथील सुजितकुमार, ऑडिट इंचार्ज यांचे पथक २२ नोव्हेंबर रोजी नागपूरला डेरेदाखल झाले. त्यांनी या संस्थेतील १४०० खात्यांची सुवर्ण पाकिटे तपासली असता ४७ खात्यांत अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले. 

या ४७ खात्यांत सोन्याच्या दागिन्याऐवजी नकली सोन्याचे किंवा प्लास्टिकचे दागिने असल्याचे पथकास आढळून आले. या गैरव्यवहाराद्वारे मुथ्थुट फायनान्सचा विश्वासघात करून ४३ लाख ४९६ रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणी रिजनल मॅनेजर विचित्र पाठक यांच्या तक्रारीवरून थॉमसविरुद्ध विश्वासघात, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.